मुंबई ( प्रतिनिधी ): दि .२९, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे . राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेईल. मुंबईत महाराष्ट्र विधान भवनात आयोजित ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी दोन दिवसीय परिषदेच्या समारोपा प्रसंगी ओम बिर्ला यांनी ही माहीती दिली . ते म्हणाले की २०१९ मध्ये तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती , पक्षांतर बंदी कायद्याचा आढावा घेणं ही एक नियमित प्रक्रिया आहे. २०१९ मध्ये राजस्थान विधानसभा तत्कालीन अध्यक्ष सी.पी.जोशी हे अध्यक्षपदी होते. आता त्यांची जबाबदारी राहुल नार्वेकर पार पाडतील बिर्ला म्हणाले.
ॲड. राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नियुक्तीवर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत –
ज्या माणसानं आतापर्यंत १० पक्षांतरं केलीत, पक्षांतर करुन ती पचवली आहेत. विधिमंडळ पक्षाच्या फुटीर गटाला मंजुरी देतात. लोकसभा अध्यक्ष बिर्लांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला जातोय, असं संजय राऊत म्हणाले. खासदार विनायक राऊत म्हणाले की,ही नियुक्ती म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याचा प्रकार आहे. तर आदित्य ठाकरे यांनी देखील टीका व्यक्त केली आहे .
सुषमा अंधारे यांनी एका सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतांना म्हणाल्या की “गुन्हेगारालाच न्यायाधीश झालेलं तुम्ही कधी बघितलले का? काय सांगता, नाही बघितले मग राहुल नार्वेकरांना बघून घ्या, महाराष्ट्रात दिवसाढवळ्या ज्यांनी लोकशाही व्यवस्थेचा मुडदा पाडला. त्याच नार्वेकरांची देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे.!!”
