मुंबई ( प्रतिनिधी ) दि. २९, आज निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा आज दि .२९ सोमवार रोजी जाहीर केल्या. पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला या सर्व ५६ जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मतदानाच्याच दिवशी निकाल लागणार आहेत. याबाबत ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असेल , तसेच अर्ज छाननी १६ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या या निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या ५६ जागांवरील निकालांनंतर भाजपचा राज्यसभेतील बहुमताचा १० वर्षांपासुनचा दुष्काळ संपून वरिष्ठ सभागृहात सत्तारूढ पक्ष पूर्ण बहुमतात येणार का याची उत्सुकता लागून राहणार आहे.
एकीकडे भाजपा, काँग्रेस , इतर सारेच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली. ही राज्यसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या जागांचा निकाल काय लागतो त्यावर संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे राजकीय चित्र नक्कीच बदलणार आहे.

