धुळे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आजकाल सोशल मीडियावर रील्स आणि स्टंट्स बनवण्याची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र, ही क्रेझ अनेकदा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते. अशाच एका घटनेत दुचाकीवर धोकादायक स्टंट करताना एका तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात दुचाकीवर स्टंट करत असताना घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सदर व्हिडीओत दुचाकीवर मागे बसलेला तरुण स्टंट्स रील्स चित्रीकरण करतांना दिसून येत आहे. तो तरुण हाताच्या बोटांनी विक्ट्री चे साइन दाखवत असतो तर ड्रायव्हिंग करणारा तरुण देखील मोबाईलकड़े बघत आहे, अशातच त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्यावरुन खाली गेल्याचे दिसत आहे. अपघातानंतरही मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरुच असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते.
या अपघातात दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. यातील मृत तरुणाचे नाव अनिरुध कळकांबे असून तो जालना जिल्ह्यातील गणेश पूरमधील रहिवाशी आहे.
