जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील लमांजन या गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने शिरसोलीपासून काही अंतरावर धावत्या रेल्वेखाली स्वतःस झोकुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कैलास भिवसन पाटील (वय ५०) हे व्यवसायाने शेतकरी होते. ते जळगाव तालुक्यातील लमांजन येथे पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्यास होते. शेती करून ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्जबाजारीमुळे सतत चिंतेत होते. त्यांनी सोसायटीचे तसेच खाजगी कर्ज घेतले होते. आपल्यावर असलेल्या या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी ०२ मार्च, शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली गावापासुन काही अंतरावर रेल्वे खांब क्रमांक ४०१ जवळ धावत्या रेल्वे खाली स्वतः ला झोकुन देत आपली जीवन यात्रा संपवली.
सदर घटना रेल्वेचे लोकोपायलट यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिरसोली रेल्वे स्टेशनमास्तर यांना कळविली. त्यावरुन लमांजन गावाचे पोलीस पाटील श्री. भाऊराव पाटील यांनी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
