नागपूर दि .०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तथागत गौतम बुद्ध यांची चलीत मुद्रेतील ५६ फूट उंचीची मूर्ती थायलंडहून नागपूरला दीक्षाभूमीवर आली असून लवकरच तेथे तिची स्थापना करण्यात येणार आहे.
तथागत गौतम बुद्ध यांची ही अष्ठधातूची मूर्ती थायलंड येथून समुद्रमार्गे भारतात आणली असुन तिचे वजन १.७ टन आहे . बुद्धमूर्तीसाठी थायलंड आणि म्यानमार या दोन देशांतील दानदाते रिवाह खंजरनविस्थे व फादर ठेंगेयाल ठ्वेला यांनी पुढाकार घेतला. थायलंड येथील चोनबुरी शहरात या मूर्तीची निर्मिती करण्यात आली. या मूर्तीची स्थापना करण्यासाठी थायलंड येथील दानदात्यांच्या उपस्थितीत मागील वर्षी दीक्षाभूमी परिसरात भूमिपूजन सोहळा पार पडला होता.
आता या मूर्तीची स्थापना करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासच्या सहकार्याने मोठा चबुतरा तयार करण्यात येणार आहे. चबुतरा तयार झाल्यानंतर सुटे भाग जोडून संपूर्ण मूर्ती उभी करण्यात येईल. मूर्तीची स्थापना करण्यासाठी थायलंड येथून इंजिनिअर येणार असून, यासाठी त्यांनीच डिझाईन पाठवले आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
