जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथून काही अंतरावर असलेल्या वाकडी या गावातील शेतकरी कुटुंबातील एक मूलगा शेतात बैलगाडी घेऊन जात असतांना बैलगाड़ी उलटल्याने अपघात होऊन त्यात सदर मुलाचा मृत्यु झाल्याने कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली आहे. मृत गौरव हा म्हसावद येथील विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता.
सविस्तर वृत्त असे की, गौरव आनंदा पाटील हा १३ वर्षांचा मुलगा वाकडी या गावात आपल्या आई, वडील, काका, भाऊ, बहीण यांच्यासोबत राहत होता. वडील आनंद पाटील हे शेतीकाम करतात. गौरव हा आज दुपारी शेतात बैलगाडी घेऊन गेला होता. शेतातल्या रस्त्याने बैलगाडीचे चाक अचानक बांधावर चढल्याने बैलगाडी उलटली, त्यात गौरवच्या बैलगाडी खाली दाबला गेल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली.
ही दुर्घटना आज दि.११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गौरवला तातडीने जळगाव येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी जमलेल्या गावकरी व कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
