मुंबई | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीच्या जागावाटप विषयी महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले असून यावर उद्या म्हणजे २१ गुरुवार रोजी मुंबईत अंतिम बैठक होणार आहे. या अंतिम बैठकीनंतरच महाविकास आघाडीची लोकसभा २०२४ च्या जागा वाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील.
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाविषयी महाविकास आघाडीच्या मुख्य पक्षांमध्ये एकमत होत नसल्याने तसेच महायुतीकडुन देखील त्यांच्या उमेदवारी घोषित होणाऱ्या विलंबामुळे अनेक दिवस चर्चेच्याच फेऱ्या सुरू होत्या. त्यातच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समावून घ्यायचे की नाही , सामावून घेतले तर किती जागा द्यायच्या याबाबतही एकमत होत नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. वंचित कडून प्रकाश आंबेडकर यांचे म्हणने होते की मी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या सोबत चर्चा करेल , त्यानुसार त्यांनी जागा वाटपविषयी काल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले होते. तसेच काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सात जागांवर पाठींबा देईल असे वक्तव्य केल्याने अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सांगता सभेनंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या आधीच दिली होती. अखेर याबाबत काल दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा होऊन काँग्रेसच्या नेत्यांचे एकमत झाल्याचे कळते.
या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची तातडीची अंतिम बैठकी उद्या मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अद्याप आमंत्रित करण्यात आलेले नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आली.
