नवी दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर दाखल केलेल्या याचीकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एसबीआय बँकेला पुन्हा नोटीस बजावली आहे. एसबीआय ने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहीतीत निवडणूक रोखे क्रमांक उघड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निबंधकांना सर्वोच्च न्यायालयात जमा केलेला डेटा उद्या, शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यास सांगितले.
दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही आदेश दिले होते की तुम्ही संपूर्ण डेटा उघड करा, परंतु तुम्ही संपूर्ण डेटा दिला नाही. आमच्या आदेशानंतरही तुम्ही युनिक नंबर का जाहीर केला नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला विचारला. सुप्रीम कोर्टाने एसबीआय ला बाँड नंबर उघड करण्यास सांगितले. यानंतर एसजी म्हणाले की, या प्रकरणात एसबीआय पक्षकार नाही. यावर सरन्यायाधीश म्हणाले की एसबीआय ने निवडणूक आयोगाला सर्व माहिती शेअर करायला हवी होती. खरेदीची तारीख, पूर्तता करण्याची तारीख इ. एसबीआय ने इलेक्टोरल बाँडचा नंबर शेअर केला नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस बजावली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
