मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे गेल्या काही दिवसांपासून अनेकक कारणांनी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेमध्ये आहेत. शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांना आणि विशेष म्हणजे अजित पवार, सुप्रिया सुळे यांना आव्हान देत बारामतीतुन लोकसभा ‘लढणार आणि जिंकणार’ अशी विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पण, आता हेच शिवतारे या संघर्षातून माघार घेण्याची बातमी समोर येत आहे.
शिवतारे आणि पवार यांच्यातला वाढता संघर्षाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या तिघांसोबत शिवतारेंची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून विजय शिवतारे यांच्या तक्रारींचं समाधान करण्यात यश आल्याची माहिती मिळाली. या बैठकीमध्ये पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांबाबत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली.
दरम्यान, शिवतारे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून लढण्याची घोषणा केली होती. परंतु शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी शिवतारेंसोबत वर्षा निवासस्थानी जी चर्चा केली, त्यात शिवतारेंची समजूत घालण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे अजित पवारांविरोधात शिवतारेंनी पुकारलेलं बंड आता थंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
