जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस पिंप्राळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे

नागरिकांना छत्री व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. तसेच युवासेना व के.पी. फाउंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील यावेळी वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून करण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संबोधित केले. तसेच पुढील ८ दिवसात शहरातील प्रत्येक भागात एकूण १० हजारांपेक्षा अधिक छत्री व टीशर्ट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी, विधानसभा सभा क्षेत्र युवा अधिकारी अमित जगताप, युवासेना महानगर युवा अधिकारी यश सपकाळे, महिला आघाडीच्या निलू इंगळे, मनीषा पाटील, जया तिवारी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी कुलभूषण पाटील यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर छत्री व टी-शर्ट चे अनावरण करण्यात आले होते. यावेळी कुलभूषण पाटील यांच्या या उपक्रमाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरभरुन कौतुक करून राजकीय कार्यास आशीर्वाद दिला होता.
