मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सदर घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे वर घडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेमुळे हादरला आहे. त्यानंतर आज रात्री मुंबई विमानतळावर अनपेक्षित घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की एअर इंडिया आणि इंडिगोच्या या दोन विमान कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले आहेत. एअर इंडियाचे AI 2732 हे विमान मुंबईहून कोइम्बतूरच्या दिशेला जाण्यासाठी धावपट्टीवर थांबलेले होते. तर इंडिगोचं 6E 791 हे विमान हैदराबादहून मुंबई विमातळावर लँडिंग केल्यानंतर टॅक्सी-वेवरून पार्क होण्यासाठी जात होते. याच दरम्यान ही दोन्ही विमाने टॅक्सी-वेवर असताना त्यांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली गेली. दरम्यान विमानांतील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती मिळतं आहे.

या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, “मुंबईहून कोइम्बतूरला जाणाऱ्या AI 2732 या विमानाला उशीर झाला होता. तसेच दोन्ही विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तांत्रिक तपासणीसाठी सध्या सेवेतून बाहेर करण्यात आले आहे.”
“सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहे. या घटनेची संपूर्ण माहिती विमान वाहतूक नियामक संस्थेला देण्यात आली आहे. दरम्यान, DGCA ने दोन्ही कंपन्यांना घटनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

