Headlines
Home » महाराष्ट्र » बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी ! एका सुशिक्षीत तरुणीस अटक

बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी ! एका सुशिक्षीत तरुणीस अटक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची आचारसंहिता सुरु असून, प्रत्येक लहान मोठा पक्ष प्रचाराकामी व्यस्त आहे. राज्य परराज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या सभा यावेळी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी होणार आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार असून सभा घेणार आहेत.

अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज मिळाला असून या प्रकारानंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून आलेल्या मेसेज मध्ये म्हटले आहे की, ‘योगी आदित्यनाथ यांनी पुढील १० दिवसांत राजीनामा द्यावा. अन्यथा आम्ही त्यांना बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे मारून टाकू’. काल शनिवार दि.२ रोजी संध्याकाळी हा मेसेज मिळाला. हा नंबर कुणाच्या नावावर रजिस्टर आहे, मेसेज कुणी केला? मेसेज करणारे मुंबईतीलच आहेत की बाहेरचे आहेत? मेसेज करणाऱ्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहेत का? की कुणी खोडसाळपणा केलाय? या सर्व बाजूंनी मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय तरूणीला अटक केली आहे. माहिती तंत्रज्ञान विषयात बीएससी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ती महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात कुटुंबासह राहते. तिचे वडील लाकूड व्यवसाय करतात. ही तरूणी सुशिक्षित असली तरी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे पोलीसांनी सांगितले.

२०२४ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यूपी पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या देणाऱ्यांना अटक देखील केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून तसेच पोलीसांना मेसेजद्वारे या धमक्या आल्या आहेत. जीवे मारण्याची धमकी देण्याप्रकरणी उत्तर प्रदेश, मुंबई आणि बिहारमधून अनेकांना अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!