ठाणे | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – युवा सेनेचा ‘युवा महाराष्ट्र’ हा राज्यस्तरीय मेळावा काल शनिवारी ठाण्यातील रेमंड मैदानात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी पक्षाच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका मांडली.
युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर शिवरायांचा छावा या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणरा अभिनेता भूषण पाटील याचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सत्यम लिंगोळे या तरुणाला युवासेना मध्यवर्ती कार्यालयात नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल, दीपेश म्हात्रे, किरण साळी, अमेय घोले आणि राज्यभरातून आलेले युवासेना युवतीसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
