जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.
ज्या दिवसांत इतर जण थकून हार मानतात, त्या दिवसांत प्रविण काबाडकष्ट करत उभा राहिला.
मजुरी असो, छोटे-मोठे काम असो, हाताला काम मिळेल ते प्रामाणिकपणे करायचे हा त्याचा स्वभाव. दिवसभर घाम गाळून रात्री थकलेल्या शरीराने झोपण्याआधी एकच ध्यास “मी पोलीस होणारच!” अभावांनी पाय ओढले, परिस्थितीने प्रश्न विचारले, पण प्रविणच्या मनात उत्तर एकच होतं ते म्हणजे ठाम निर्णय, अढळ जिद्द, आणि अपार मेहनत.

अनेक वेळा अपयश आलं, अनेक वेळा मन खचण्याच्या उंबरठ्यावर आलं, पण प्रविण कधीच तक्रार करत बसला नाही. तो स्वतःशीच लढत राहिला… कारण त्याला माहित होतं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला हरवावं लागतं. आज तो पोलीस आहे. पण तो केवळ नोकरी मिळवलेला युवक नाही. तो आहे संघर्षावर मात केलेला योद्धा. ज्याने गरिबीला हरवलं, ज्याने परिस्थितीला नमवले, आणि ज्याने सिद्ध केलं की शांत, संयम आणि सततचे कष्ट हेच खरे शस्त्र आहेत.
प्रविण निकम यांचा हा प्रवास असंख्य तरुणांसाठी प्रेरणा आहे, आणि समाजासाठी संदेश आहे की, स्वप्न पाहणं गुन्हा नाही, पण स्वप्नांसाठी झगडणं हीच खरी देशसेवा आहे.
दिपक जाधव,
वास्तव पोस्ट संपादक -जळगाव

