नाशिक ( वास्तव पोस्ट ) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे दि.१२,गुरुवार रोजी निधन झाले. त्यांना श्वासोच्छवासाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान पक्षाने एका निवेदनाद्वारा येचुरी यांच्या निधानाची माहीती दिली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व विचारवंत कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीचे, श्रमिकांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. देशाच्या कम्युनिस्ट चळवळीतील ते सर्वात लोकप्रिय नेते होते. त्यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील श्रमिकांच्या चळवळीला, डाव्या चळवळीला भरीव मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद याचेशी त्यांची अतूट बांधिलकी होती. भारतीय संविधानाच्या रक्षणाच्या लढ्यातील ते प्रमुख नेते होते.
नाशिकशी त्यांचे विशेष संबंध होते. आदिवासी भागातील श्रमिकांचे लढे, इंडियाबुल्स विरोधातील सिन्नरच्या शेतकऱ्यांचा संघर्ष, नाशिक व महाराष्ट्रातील बंद पडलेल्या सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांचे संघर्ष, भांडवली शोषणाविरुद्ध कामगारांचे झालेले प्रखर लढ्यांशी त्यांचा थेट संबंध होता व त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
