Home » महाराष्ट्र » ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील दुसर्‍या टप्प्यातील निधी वाटपाचा शुभारंभ !

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील दुसर्‍या टप्प्यातील निधी वाटपाचा शुभारंभ !

नागपुर ( वास्तव पोस्ट ) : नागपूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संवाद सोहळ्याला उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. तसेच यावेळी या योजनेच्या टप्पा दोनच्या निधीचे वितरण देखील करण्यात आले.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, आमदार समीर मेघे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने आलेल्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आलेल्या महिला भगिनींना भेटून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. यावेळी काही बहिणींनी राख्याही बांधल्या.

यावेळी १० महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना आणि महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभही प्राथमिक स्वरूपात वितरित करण्यात आले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी, पोलीस आयुक्त डॉ. सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदींना उत्तम आयोजनासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या महिला भगिनींपुढे नतमस्तक होतो, अशी भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय झाली असून आतापर्यंत १ कोटी ६० लाख महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या तिजोरीत भाऊ आणि बहिणींचेच पैसे जमा आहेत. तेच त्यांना परत करत असल्याचे सांगितले. राज्यातील बहिणींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच आमचे खरे समाधान आहे. या योजनेने आतापर्यंतचे सगळे रेकोर्ड मोडीत काढले आहेत. आज या योजनेचा टप्पा दोन सूरु झाला असून यापुढे तिसरा टप्पाही करू, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!