शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : “महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते एक विचारमंत्र होते,” असे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून समाजातल्या वंचित, शोषित घटकांना आवाज दिला. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं.” “समाजाचं खरं उध्दार हे शिक्षणातूनच शक्य आहे, याचा मंत्र महात्मा फुलेंनी दिला आणि तो आजही तितकाच प्रभावशाली आहे.” “भारतीय समाजाच्या इतिहासात जेव्हा अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमतेचे गडद सावट पसरले होते, तेव्हा ज्यांनी सत्य, समता आणि शिक्षणाचे तेज उजळले असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आजही मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतात,” अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. ते आज शिरसोली प्र.न. येथे महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. माळी समाज युवक फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी गावातील राजमार्गावरून महात्मा फुले यांची जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढून जयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. विजय पाटील यांनी केले. आभार माळी समाज युवक फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश माळी यांनी मानले.
कार्यक्रमास माजी सभापती नंदलाल पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, शेनफडू पाटील, शशिकांत पाटील, माळी समाज युवक फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन माळी उपाध्यक्ष प्रकाश माळी प्रणय सोनवणे, ज्ञानेश्वर माळी, कैलास माळी, उमाजी पानगडे, रामकृष्ण काटोले, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर साबळे, भगवान पाटील, राहुल पाटील, भगवान बोबडे, शिवदास बारी, राजेंद्र फुलवाडे, नाना साबळे, अकील मणियार, बापू मराठे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
