जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलीया, सचिव विश्वनाथ जोशी, मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेशापासून ते निरोप समारंभापर्यंतच्या प्रत्येक क्षणांचे आणि प्रसंगाचे वर्णन आपल्या संगीतमय नाटकातून सादर करत शाळेविषयी ऋण व्यक्त केले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली.

याप्रसंगी शिक्षक सुनील दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसोबतचे अनुभवाचे क्षण कवितेद्वारे आपल्या मनोगतातून व्यक्त करत विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. प्राथमिक मुख्याध्यापिका माया आंबटकर माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन करून एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी तसेच पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खूप अभ्यास करा, शाळेचे नाव उज्वल करा असा संदेश संस्थेचे सचिव विश्वनाथ जोशी यांनी देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.आर.एस. डाकलिया यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील विविध मोठमोठ्या महान व्यक्तींचे उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून घवघवीत यश मिळवून, आई-वडिलांचे व शाळेचे नाव उज्वल करा असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गिरीश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

