जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणूकीसाठी जळगाव शहर मतदार संघातुन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली नाही, परंतू येथेच न थांबता शहराच्या विकासासाठी, प्रत्येक नागरीकाच्या कल्याणासाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असल्याचे यावेळी कुलभूषण पाटील यांनी सांगितले.

निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता हा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु प्रत्येकालाच संधी मिळत नसते. मलादेखील पक्षाकडून संधी मिळाली नाही. परंतु मी या जळगाव शहराच्या विकासासाठी तसेच शहराची अविकसित शहर ही ओळख पुसण्यासाठी अपक्ष म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे यावेळी कुलभूषण पाटील यांनी सांगितले.

यावेळी माध्यमांसमोर बोलतांना कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहरवासीयांना आवाहन केले की, शहराचा विकास करून जळगाव शहराचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचा माझा प्रयत्न असेल. मी असं सांगणार नाही की मी १०० दिवसात शहराला सिंगापूर करेल मात्र जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, तसेच गेल्या अनेक वर्षापासून शहरातील युवकांना भेडसावणारा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सोडवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल. तसेच शहरातील माता भगिनींना सुरक्षीतता आणि याठिकाणच्या प्रशासनास मजबूत करून, शहरास स्वच्छ व सुंदर, आरोग्याविषयीच्या सुविधा आदी सर्वांगीण विकास करण्यासाठी जळगावकरांनी मला संधी द्यावी असे आवाहनही जनतेस केले.
