Home » जळगाव जिल्हा » पोलिस संरक्षणात नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने घेतला ताबा !

पोलिस संरक्षणात नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने घेतला ताबा !

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या समस्येत सापडले होते. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करून दाखले देण्यास टाळाटाळ करत होते.

या गंभीर परिस्थितीची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कृती करत, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण व खलील पठाण यांचे पथक शाळेत दाखल होण्याचे निर्देश दिले.

दरम्यान प्रभारी मुख्याध्यापकाने शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून प्रशासनाच्या पथकास प्रवेश नाकारला. यानंतर करनवाल यांनी स्वतः लक्ष घालून पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून सहाय्य मागितले. जिल्हा पोलीस प्रशासनानेही त्वरित प्रतिसाद देत, शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे संबंधित प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा व शकील शेख मुसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आज शनिवार, दि २८ जून २०२५ रोजी पोलीस संरक्षणात माध्यमिक शिक्षण विभागाचे पथक पुन्हा शाळेत गेले. कार्यालयास कुलूप असल्याने अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कुलूप तोडण्यात आले आणि गटशिक्षणाकारी सरला पाटील यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार एकतर्फी स्वीकारून, विद्यार्थ्यांना उपलब्ध दप्तरी माहितीच्या आधारे दाखले तयार करून वाटप केले.

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता व कायद्याच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क सुनिश्चित करण्यासाठी घेतलेली ठोस भूमिका ही अनुकरणीय आहे. तसेच ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवून, जिल्हा परिषद प्रशासनाने समाजात सकारात्मक उदाहरण ठेवले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!