नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : सोशल मिडिया प्रकारातील एक लोकप्रिय मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्समध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली. पॅरिसजवळील बॉर्गेट विमानतळावर उतरताच फ्रेंच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. डुरोव हे अजरबैजानहून खासगी जेटने फ्रान्समध्ये पोहोचले होते.
फ्रान्स मीडियानुसार, टेलिग्राम ॲपच्या संदर्भात एका प्रकरणामुळे ही अटक करण्यात आली आहे. फ्रान्स सरकारच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामवर नियंत्रक नसल्याने काही गुन्हेगारी कृत्ये घडली आहेत, ज्यामुळे सरकारने ॲपच्या घडामोडींवर लक्ष केंद्रीत केले आहे. या ॲपचा वापर गुन्हेगारी घडामोडीत वाढल्याचा आरोप आहे.
दरम्यान डुरोव यांच्या अटकेनंतर टेलिग्रामकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या जगभरात ९०० दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्त्यांसह टेलिग्रामचा मोठा वापरकर्ता वर्ग आहे. भारतातही या ॲपने लोकप्रियता मिळवली आहे.
डुरोव यांनी २०१४ मध्ये रशिया सोडून दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. फ्रान्स सरकार गेल्या काही महिन्यांपासून आपल्यावर दबाव टाकत असल्याची टिका डुरोव यांनी सरकारवर केली आहे. ते पुढे म्हणाले की, या घटनेमुळे रशियातील ब्लॉगर्सनी फ्रान्सच्या दूतावासासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. डुरोव यांची लोकप्रियता रशियातही मोठी आहे.
फ्रेंच सरकारने रशियन वंशाच्या डूरोववर अनेक गंभीर आरोप केले आहेत, जर हे आरोप सिद्ध झाले तर डुरोव यांस २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारत सरकारही टेलिग्रामच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्र सरकार डुरोवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कारवाईदरम्यान सरकारला योग्य वाटल्यास टेलिग्राम ॲपवर भारतातही बंदी घालता येईल.
माहिती आणि तंत्रज्ञान (IT) मंत्रालय लवकरच टेलीग्रामद्वारे होत असलेल्या विविध बेकायदेशीर क्रियांवर आपल्या शिफारशी गृह मंत्रालयाला पाठवेल. त्यात मनी लाँड्रिंग, ड्रग तस्करी आणि पेडोफिलिक सामग्रीचे सामायिकरण इत्यादी चा समावेश असेल. दरम्यान आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालय विविध बेकायदेशीर कामांबाबत टेलिग्रामवर लक्ष ठेवून आहे .
