Home » जळगाव » तरुण गायकांच्या प्रतिभेतून रंगली “तेज-गंधर्व” शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न

तरुण गायकांच्या प्रतिभेतून रंगली “तेज-गंधर्व” शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्रच्या स्वरदा संगीत विभागातर्फे आयोजित दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ शास्त्रीय गायन स्पर्धा रविवारी दि.८ डिसेंबर रोजी मु.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते. यमन, देस, मुलतानी, केदार, जनसंमोहिनी, मलकौंस, बिहाग, गोरख कल्याण अशा विविध रागांचे गायन करून बडाख्याल, छोटाख्याल सादर करीत अनेक युवा विद्यार्थ्यांनी दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ आयोजित “तेज-गंधर्व” या शास्त्रीय गायन स्पर्धेमध्ये रंगत आणली.

उदघाटनावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. प्रवीणचंद्र जंगले, केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य स.ना. भारंबे, तेजसचे वडील नितीन नाईक व आई सुवर्णा नाईक उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन केले. शास्त्रीय संगीत प्रत्येकांपर्यत पोहोचावे, ते रुजावे व आत्मसात देखील व्हावे या उद्देशातून स्पर्धा आयोजित होत असते.

दिवंगत तेजस नाईकने लहानशा आयुष्यात शास्त्रीय संगीतावर भरभरून प्रेम केले. त्याची स्मृती कायम राहावी, उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे याकरिता स्पर्धा आयोजित केल्याचे प्रस्तावनेतून प्रा.प्रसाद देसाई यांनी सांगितले. तेजस नाईकच्या आईचे मनोगत तेजसच शास्त्रीय गायनावर असलेलं प्रेम आणि त्याची आठवण कायम राहावी.आणि आमचा तेजस जरी आज या जगात नसला तरी तेजस सारखे कलावंत घडावेत या उद्देशाने तेज गंधर्व ही शास्त्रीय गायन स्पर्धा सुरू करण्याचे आम्ही ठरवले, आणि या विचारांना मू.जे. महाविद्यालयाची मिळालेली अनमोल अशी साथ आणि सहकार्य यामुळे ही स्पर्धा खूप कमी वेळात राज्यभरात प्रसिध्द झाली आहे.

संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. आणि ही स्पर्धा अजून खूप मोठी होईल अशी भावना तेजसच्या आई सुवर्णा नाईक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. भारंबे यांनी, विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात संधी व प्रोत्साहन मिळाले की पुढे जात राहावे. कलेची आवड जोपासत शास्त्रीय संगीताचा देशाचा वारसा अधिक उज्ज्वल करावा, असे सांगितले. यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ.किशोर देशमुख अकोला व प्रा. डॉ. सोपान वतारे यांनी केले.

स्पर्धेत राज्यभरातून ८ ते १५ वर्षांचा लहान गट व १६ ते २८ वर्षाचा मोठा गट सहभागी होता. लहान गटात १८ तसेच मोठ्या गटात २० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर आणि प्रा. ईशा वडोदकर यांनी केले. संगीत विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. मयुरी हरिमकर आणि मानस नाईक, अनुज पाटील, राजेश्वरी रत्नपारखी, ओम जवंजाळकर, सलोनी मोरे, प्रज्ञा तांबट, चेतन माळी, नेहा चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल :
लहान गट :
प्रथम : निषाद केदार देशमुख (छ. संभाजीनगर)
द्वितीय : दूर्वा दिनेश संन्यासी (जालना)
तृतीय : मुलांशु सुनील परदेशी (अहिल्यानगर)
उत्तेजनार्थ प्रथम: राघव राजेंद्र पाटील (धुळे)
उत्तेजनार्थ द्वितीय: अन्वी संदीप सनप (पाचोरा)
मोठा गट :
प्रथम : सागर अभय देशमुख (पुणे)
द्वितीय : मंगेश शंकरराव वाघ (हिंगणघाट)
तृतीय : वैष्णवी राजेंद्र कन्हाळे (भुसावळ)
उत्तेजनार्थ : शिवम दीपक शर्मा (अकोला), अजय प्रकाश हागे (जळगाव जामोद)

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!