मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. तथापि, मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येते. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुशंगाने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक शासन परिपत्रक काढून त्यात राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०२२८१६२५३१७८२१ असा आहे. अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावयाची आहे.
ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम ४ मध्ये करण्यात आलेली आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर करून शासनस्तरावरुन संबंधित शाळेवर कार्यवाही करण्यात येईल.
