Home » जळगाव » शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : शैलेंद्र सपकाळे

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : शैलेंद्र सपकाळे

सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांचे कडून आयुक्तांना निवेदन सादर

जळगांव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शिवाजी नगर भागामधील धनाजी काळे नगरातील ४ वर्षीय बालिकेला मोकाट कुत्र्यांनी गंभीर दुखापत केलेली होती, तिच्यावर जळगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उस्मानिया पार्क येथे लहान मुलांवर देखील या मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता वाल्मिक नगर परिसरातील राहणारे प्रकाश चिंतामण कोळी यांच्या ११ बकऱ्या घराच्या जवळ असलेल्या गोठ्यात बांधण्यात आलेल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री मोकाट असलेल्या कुत्र्यांनी गोठ्यात हल्ला चढवून ११ बकऱ्या फस्त केल्या आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजता हा प्रकार लक्षात आला. यात शेळी मालकांचे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून दैनिक वृत्तपत्रात मोकाट कुत्रे चावा घेतल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, परंतु महानगरपालिका कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. व त्याचा परिणाम जळगाव शहरातील सामान्य जनता, लहान बालके व प्राण्यांच्या जिवाशी आलेला आहे. तरी या मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम लवकरात लवकर महानगरपालिकेने हातात घेवून त्या मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. ह्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तीन दिवसात न झाल्यास सदरहू मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम मी स्वतः नागरिकांच्या मदतीने हाती घेईल व त्या मोकाट कुत्र्यांना महानगरपालिकेच्या आपल्या कार्यालयात आणून सोडण्यात येईल याची आपण गंभीरतेने दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!