Home » क्रीडा » T-20 WC : ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनल मध्ये

T-20 WC : ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनल मध्ये

सेंट लुसिया ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. हा सामना भारताने जिंकत उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे आव्हान मात्र खडतर बनले आहे. बांग्लादेश आणि अफगानिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर त्यांचे सेमीफाइनल चे स्थान अवलंबून आहे.

ऑस्ट्रेलियासाठी अतिशय महत्वाच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर प्रथम फलंदाजीचे आव्हान स्विकारत कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीत आपले रौद्र रूप दाखवले. रोहीत तूफानी अंदाजमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटुन पडला. रोहितनं १९चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले, मात्र आठ धावांनी त्याचं शतक हुकले. रोहितच्या आक्रमक ९२ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकात २०५ धावांचा डोंगर उभारला.

भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विराट कोहली आजही अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतसोबत ३८ चेंडूत वादळी ८७ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. रोहितने ४१ चेंडूत आक्रमक ९२ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने ८ षटकार आणि ७ चौकार लगावले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवनने ३१, शिवम दुबेनं २८, हार्दिक पांड्यानं नाबाद २७* धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल स्टार्कनं २-२ विकेट घेतल्या. तर जोश हेझलवूडला १ विकेट मिळाली.

विजयासाठी मिलालेल्या २०५ धावांचे लक्ष्य गाठतांना अर्शदीपने पहिल्या षटकात डेव्हिड वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. डेव्हिड वॉर्नरने ६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्याच षटकात भारताला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार शॉन मार्शला बाद करण्याची संधी ऋषभ पंतने घालवली. त्यानंतर मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांची चांगलीच भागीदारी पाहायला मिळाली. हेड आणि मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. ही जोडी डोकेदुखी होत चालली होती.

त्याचवेळी अक्षर पटेलने सीमारेषेवर अफलातून कॅच पडकल्याने मार्श बाद झाला. मार्शने २८ चेंडूंत ३७ धावा केल्या. मार्श बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला आला. त्याने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. पण कुलदीप यादवने मॅक्सवेलला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. मॅक्सवेल १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉइनिसला अक्षर पटेलने दोन धावांवर बाद केले. ट्रेव्हिस हेड हेडने एकबाजू लाऊन धरत अर्धशतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण हेडला जसप्रीत बुमराहने बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने झुकायला लागला. हेडने ४३ चेंडूंत जोरावर ७६ धावा केल्या. यात ९ चौकार आणि चार षटाकारांचा समावेश होता. शेवटी ऑस्ट्रेलियाचा डाव ७ बाद १८१ वर संपुष्टात आला. भारताकडून अर्शदीपने ३ , कुलदीप २, बूमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १ गड़ी बाद केला.

टी-20 विश्चषकात आजच्या या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीतमध्ये टीम इंडियाची गाठ इंग्लंड संघासोबत २७ जून गुरुवार रोजी होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या या सामन्यात पाऊस आला तरी टीम इंडियाला आयसीसी रँकिंकमध्ये एक नंबर वर असल्याने फायनलमध्ये प्रवेश मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!