Headlines
Home » शैक्षणिक » चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र

चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र

चांदवड ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व मैत्रिणी एकत्र आले. निमित्त होते शाळेविषयी व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी. तब्बल चोवीस वर्षांनी सर्वजण एकत्र आले व एकमेकांना भेटले. सर्वांना संपर्क करण्याचे व एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम संतोष आहेर व साधना खैरनार यांनी केले.

आयुष्यात दहावी ही नव्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास ठरवणारी दिशादर्शक पायरी असते. इथूनच विद्यार्थ्यांच्या जीवनाची दिशा बदलते. दहावीनंतर बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या वाटांनी निघून जातात आणि आपापल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःची जडणघडण करतात. बऱ्याच वेळा एकमेकांचा संपर्क होत नाही. मात्र डिजिटल युगात समाजमाध्यमांच्या वापराने सर्व जण पुन्हा एकत्र येतात.

याच डिजिटल माध्यमातून सर्व विध्यार्थी एकत्र आले. चांदवड येथील हॉटेल काठीयावाड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक सदाशिव शेडगे, उमाकान्त वारके, डी.एल. पवार, ए.एस.पवार, एस.एम.देवरे, एस.जी.गांगुर्डे, अशोक निकम, रमण खुटे, तुळशीराम पेंढारी, संजय सोनवणे, वसंत जाधव, अर्जुन गांगुर्डे आदी शिक्षक उपस्थित होते. त्यांचे माजी विद्यार्थी व आत्ताचे यशस्वी शेतकरी, सैनिक, शिक्षक, व्यावसायिक, नोकरदार, उद्योजक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले बघून सर्वजण भारावून गेले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सदाशिव शेडगे होते. आम्ही तुमच्यावर संस्कार केलेत तसेच आता तुम्ही पुढच्या पिढीवर करावे व आपल्या आई-वडिलांची व देशाची सेवा करावी अशा भावना त्यांनी मांडल्या. याच सोबत सर्व शिक्षकांनी आपल्या भावना मांडल्या व सर्वांचे कौतुक केले . असेच सारे एकदिलाने एकत्र येऊन समाजहिताचे कार्य करावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याच बॅचचे कवी दिनेश शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपान गांगुर्डे , भाऊसाहेब गांगुर्डे, सुनील मापारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला अनिता पाटील, भारती भूतनार, शिना गांगुर्डे, अनिता गाढे, सविता नवले, शैला गांगुर्डे, अनिता गांगुर्डे, प्रदीप शिलावट, संदीप जाधव, आनंदा शिंदे, दत्तू भोईटे, सुभाष पवार, खंडू नवले, शांताराम गांगुर्डे, ज्ञानेश्वर पवार, नवनाथ झाल्टे, नवनाथ राजनोर, गोविंद गांगुर्डे, शिवाजी आहेर, गणेश गाढे, आत्माराम मापारी, अनिल मापारी, दीपक गिरी, खंडेराव गांगुर्डे, गोपीनाथ कांगुणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!