धुळे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या वाढत्या तापमानाचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. त्यातच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
धुळ्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून तापमानाने ४४ ते ४५ अंशाचा आकडा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तिव्र उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असून दिवसा तसेच रात्री देखील घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात ४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रस्त्यावर भीक मागणारे व अन्य बेवारस व्यक्तींचा समावेश आहे.
उष्माघातामुळे त्यांचा जीव गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर अजिबात पडू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करण्यासाठी सामाजिक संघटनांनी, संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे.
दरम्यान जळगाव आणि अकोल्यात वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केले आहे. सकाळी ११:३० ते सायंकाळी ४:३० या कालावधीत बाहेर जाणे नागरिकांनी टाळावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे कामगारांना काम करणे बंधनकारक करता येणार नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये कामाच्या ठिकाणी पाण्याची सोय, पंखे, कुलर यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेशही प्रशानसाने दिले आहेत.
