जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे पद्मालय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर महाराष्ट्र, जिल्हा व तालुकास्तरावरील नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत जळगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी वावडदा (ता. जळगाव) येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, गौरी उद्योग समूहाचे चेअरमन तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करणारे सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व सुमित जानकीराम पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली.

ही केवळ पदाची निवड नाही, तर पत्रकारितेच्या मूल्यांवरील विश्वासाची निवड आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. सत्यासाठी उभे राहणे, सामान्य माणसाचा आवाज बनणे आणि अन्यायाविरोधात निर्भीड लिखाण करणे – हीच ओळख असलेल्या सुमित पाटील यांची ही निवड म्हणजे ग्रामीण पत्रकारांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व, हसतमुख पण ठाम भूमिका, आणि गरजूंना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुमित पाटील ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा अनुभव, संघटन कौशल्य आणि संघर्षशील वृत्तीमुळे जळगाव तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना आता नवा जोर मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या निवडीचे वृत्त कळताच वावडदा गावासह संपूर्ण पंचक्रोशीतून, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

