Headlines
Home » महाराष्ट्र » सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुजित सुरवाडे ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुजित सुरवाडे ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनानिमित्त राज्‍यस्‍तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा सुरेश भट सभागृह नागपूर येथे उत्‍साहात पार पडला. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, तांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा कुटुंबियांसह सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी मुळचे जळगाव येथील मूळ रहीवासी असलेले व सध्या इमारत संकल्पचित्र मंडळ कोकण भवन, नवी मुंबई येथे कार्यरत असलेले तांत्रिक संवर्ग स्थापत्य गटातील शाखा अभियंता सुजित भाऊराव सुरवाडे यांना, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून राज्‍यस्‍तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सुजित सुरवाडे हे सहकुटूंब उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते हे देशाच्‍या परमवैभवासाठी आवश्‍यक असलेली व्‍यवस्‍था उभी करत असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्‍यांच्‍या खांद्यावर असते. त्‍यामुळे हा विभाग म्‍हणजे देश उभारणीसाठीची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील तसेच, पायाभूत विकास महामंडळ सचिव विकास रामगुडे, सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे व राज्‍यभरातील बांधकाम विभागाचे पदाधिकारी, अभियंते उपस्थित होते. आसावरी गलांडे-देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर जनार्दन भानुसे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!