अयोद्धया, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर शहरातील लोकांची ये-जा वाढली आहे. मंदिरात प्रभू रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असून ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ नावाचा नवीन रस्ता तयार करण्याची घोषणा केली आहे तो रस्ता हनुमान गढी मंदिराला अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराशी जोडेल. २९० मीटर लांबीच्या या मार्गाचा उद्देश भाविकांना राम मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे. प्रभु रामाच्या दर्शनासाठी दररोज दोन ते अडीच लाख भाविकांची वाढती संख्या पाहता सुग्रीव पथ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झाली आहे.
यूपी सरकार अयोध्येतील तीर्थयात्रा वाढवण्यासाठी कटिबद्ध असून नवीन मार्गाच्या निर्मितीमुळे लोकांना मंदिरात जाणे सोपे होणार आहे. सुग्रीव पथाच्या बांधकामासाठी अंदाजे ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्याच्या बांधकामानंतर भाविकांना राम मंदिरापर्यंत पोहोचण्यात कोणताही अडथळा येणार नाही.
पाच कोटी रुपयांचे बजेट भूसंपादनासाठी :
बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली आहे .अर्थसंकल्पातील ५.१ कोटी रुपये हे भूसंपादनासाठी राखीव ठेवण्यात आले असुन , उर्वरित रक्कम १७ मीटर रुंदीचा कॉरिडॉर तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामध्ये पायी जाणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पाच मीटरचा पदपथही बांधण्यात येणार आहे .
