Headlines
Home » महाराष्ट्र » अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधीची भरीव तरतूद : पालकमंत्री अब्दुल सत्तार

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधीची भरीव तरतूद : पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ): अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असे अल्पसंख्यांक व औकाफ, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

हज हाऊस येथील सभागृहात मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. अल्पसंख्यांक आयुक्त मोहीन ताशिलदार, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मगदूम, यांच्यासह लाभार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी कर्ज योजना, परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, उद्योग कर्जपुरवठा, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कर्ज पुरवठा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, नागरिक यांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले. एक दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया अर्जासाठी लागणारी कागदपत्रे याबाबतचे प्रशिक्षण व माहिती देण्यात येत आहे, याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील सर्व घटकांनी घ्यावा असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूरीचे प्रमाणपत्र वाटप पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

पाच जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात वसतिगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये नारेगाव, नाशिक जिल्हा मालेगाव, नागपूर, मुंबई येथे वसतिगृह सुरू येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!