जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव आयोजित ७ दिवसीय एन.एस.एस. हिवाळी शिबिराचा चौथा दिवस शिरसोलीमध्ये उत्साहात पार पडला. शिबिराची सुरुवात योगा आणि प्रार्थनेसह करण्यात आली. सायंकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने आर.टी.ओ. विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले व रस्ता सुरक्षा यावर कार्यक्रम व पथनाट्य सादर केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरसोली ग्रामपंचायत यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये मंडप व साउंड सिस्टिम व्यवस्था करुन दिली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्याने आर.टी.ओ. विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान यावर मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, सरपंच उषा अर्जुन पवार, पोलिस पाटिल श्रीकृष्ण बारी, माजी सरपंच अँड.प्रवीण पाटील व अर्जुन पवार हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वाहन निरीक्षक विनोद चौधरी यांनी नागरिकांना रस्ता सुरक्षा विषयी व विविध नियम व अटी यांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच एस.एस.मणियार विधी महाविद्यालय जळगाव येथील एन.एस.एस. स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले. प्रा. गणपत धुमाळे व प्रा. स्वाती लोखंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शिरसोली गावातील नागरिकांना देखील माहिती दिली.
पथनाट्याद्वारे नयन आरखे, व ईश्वर मांडोळे यांनी CPR ( कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन ) विषयी महत्त्वाची माहिती दिली. शीतल नाव्ही, रुपाली पाटील, रोहित बनसोडे, राहुल तेली, जगदीश राठोड, प्रसेंजित निकम, जागृती महाजन, साक्षी शुक्ला, दीप्ती भिरूडे व इतर स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षाबाबत महत्त्वाचा संदेश दिला.
त्यानंतर एन.एस.एस. स्वयंसेवकांनी शिरसोली मधील आठवडे बाजार परिसर स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.
स्वच्छता अभियानासोबत स्वछ्तेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वयंसेवकांनी विविध सामाजिक मुद्द्यांवर जोरदार घोषवाक्ये दिली. या घोषवाक्यांमधून समाजातील विविध समस्यांवर आपले विचार मांडण्यात आले आणि एक सामाजिक चळवळीला चालना मिळाली.
त्यानंतर, दोन अतिथी व्याख्याने घेण्यात आली. दिपाली पाटिल व प्रतिभा चौधरी यांनी “एड्स प्रतिबंधक उपाययोजना” या विषयावर, तर डॉ. रेखा पहुजा यांनी “बालविवाह” या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन एन.एस.एस. स्वयंसेवक योगेश्वरी राखुंडे, ईश्वर मांडोळे, जागृती महाजन आणि प्रथमेश बागुल यांनी केले व आभार, कुशाग्र विसावे यांनी केले.
