Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला त्यात गोळीबाराच्या आवाजा नंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं.
बटलर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातील वेळेनुसार ही घटना १३ जुलै रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
इवांका यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, “सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनी जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल मी आभार मानले आहे.
● नेमकं काय घडलं ?
पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला. यात ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी छेदून गेली. ट्रम्प यांनी क्षणाचाही विलंब न करता कानाला हात लावत खाली झुकले आणि काही क्षणातच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत, घटनास्थळापासून बाजूला नेले.
डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली घेऊन जात असताना ते उपस्थित लोकांकडे बघून अभिवादन करताना दिसून आले. त्यांच्या उजव्या कानाला दुखापत झाल्याने चेहऱ्यावर रक्त्त दिसत होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन ट्रम्प यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस यंत्रणेतील सूत्रांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केलं आहे. या सूत्रांनी हेही सांगितलं की संशयित पुरुष हल्लेखोर हा रायफल घेऊन आला होता आणि त्याने मंचापासून २०० ते ३०० मीटर दूर असलेल्या एका इमारतीच्या छतावरून गोळीबार केला. रविवारी सकाळी एफबीआयने एका निवेदनात शूटरचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स हा २० वर्षीय युवक बेथेल पार्क, पेनसिल्व्हेनिया येथील असल्याचे जाहीर केले.
दरम्यान यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात भाषण करत होते.
हल्ल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी पहाटे न्यू जर्सी येथे गेले. विमानातून उतरतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, एफबीआय फील्ड ऑफिसर केविन रोजेक यांनी या हल्ल्याला ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न मानलं जात असल्याचं सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली याप्रकरणाची चौकशी होणार आहे. या हल्ल्यातील हल्लेखोर मारला गेल्याने तपासाची दिशा ठरविण्यास वेळ जाईल असे समजते.
