भुसावळ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रेल्वेचे मोठे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आला. अक्षरशः सिनेस्टाईलपणे धावत्या कारवर गोळीबार करून हल्लेखोरांनी दोघांना संपवलं. यामुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गोळीबारात भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे या दोघांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे संपू्र्ण भुसावळ शहरच हादरले आहे. बुधवारी रात्री हा खळबळजनक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे बुधवारी दोघेही कारमधून जात असतांना त्यांचा पाठलाग करणारे अज्ञात मारेकरी मागून आले आणि त्यांनी जळगाव नाका मरीमाता मंदीर परिसरात या दोघांवर बंदुकीतून गोळीबार केला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर जवळपास दहा ते पंधरा राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह रात्रीच पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जिल्हा रुग्णालयात रात्री तीन वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव भुसावळ शहरात नेण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तात दोघांवर भुसावळ शहरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हल्ल्यामागचे नेमके कारण काय, त्यांच्यावर हल्ला कोणी केला, त्यात कोण-कोण सामील होते याचा पोलीस कसून शोधत घेत असून मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले आहे.
