Headlines
Home » जळगाव » धक्कादायक : महामार्गाच्या मध्यभागी लागला उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्सचा ढिग ; सूचना देणारा धोकेदायक फलक मात्र कोठेच नाही !

धक्कादायक : महामार्गाच्या मध्यभागी लागला उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्सचा ढिग ; सूचना देणारा धोकेदायक फलक मात्र कोठेच नाही !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक निष्पाप बळी जात असतांना देखील गेंड्याच्या कातडीचे प्रशासन अद्यापही निद्रिस्तच आहे. बुधवार दि.२८ रोजी गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क दरम्यान महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच दोन बळी गेल्यानंतर देखील प्रशासन निद्रिस्तच असुन जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोणतेच पाऊल न उचलल्याचे आजच्या महामार्गाच्या चित्रावरुन दिसून येत आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर जिल्हा उद्योग केंद्राच्या दिशेने महामार्गाची अवस्था खूपच भयावह झाली असुन संबंधित महामार्ग विभाग आणि प्रशासन यांच्या मनात आहे तरी काय ? असा संतप्त प्रश्न निर्माण झाला आहे. अजुन किती निष्पाप बळी यांना पाहिजेत, किती संसार यांना उघड्यावर आणायचे आहेत, परवाच्या अपघातात आईच्या मायेस पोरका झालेला रुद्र…! अजुन असे किती रुद्र या लोकांना बघायचे आहेत ?

प्रशासनातील या लोकांच्या दगडरूपी हॄदयास कधी पाझर फुटेल, कधी हा महामार्ग मोकळा श्वास घेणार आणि कधी सर्व सामान्य लोकांचा जीव भांड्यात पडेल अनेक संतप्त प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री याच रस्त्याने ये जा करतात, पालकमंत्री म्हणून त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही ?

आज सकाळी सदर स्पॉटवर गेलो असता, महामार्गावर मधोमध कोरडा गारा आणि त्यात पेव्हर ब्लॉक्स चा ढिग जमा झाल्याचे भयानक दृश्य दिसून आले. विशेष म्हणजे तेवढा रस्ता वाहतुकीसाठी बंद देखिल केलेला नव्हता. तसेच आज सकाळी ८:३० वाजेपर्यंत तरी त्या ठिकाणी वाहन चालकांसाठी रस्त्याच्या आजबाजुला कोठेच धोक्याची सूचना असलेला फलक किंवा सावधानतेसाठी इतर काहीही फलक लावलेले नव्हते. शिवकॉलनीकडून येणार वाहन भरधाव वेगाने येऊन अचानक आपला वेग कमी करत होते.

तर दुचाकी चालकांना देखील मोठी तारेवरची कसरत याठिकाणी करावी लागत आहे. कारण डाव्या बाजूने सर्वत्र खडी पसरली असुन त्यावर मोटरसायकल घरसण्याची दाट शक्यता आहे. अशा या गलथान कारभारामुळे सहाजिकच वरील प्रश्न मनात निर्माण होतात.

पावसाळ्याच्या पूर्वार्धात यांचे ठेके मंजूर होतात. भर पावसाळ्यात कामे करता येत नाही म्हणून यांच्या कामांना ब्रेक लागतो. पावसाळा गेला की यांना कच्चा माल तथा डांबर उपलब्ध होत नाही. सगळं सुरळीत झाले की मध्येच अर्ध्यावर यांना निधि अपुरा पडतो… राहिलेच तर एखाद आचारसंहिता यांच्याकरीता धावून येत असते. असे हे वेळकाढू धोरण थांबवून लवकरात लवकर कामे मार्गस्त लावणे गरजेचे झाले आहे.

One thought on “धक्कादायक : महामार्गाच्या मध्यभागी लागला उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्सचा ढिग ; सूचना देणारा धोकेदायक फलक मात्र कोठेच नाही !

  1. आपल्या वृत्ताची दखल घेण्यात आली असुन, दि.३० ला रात्री सर्व ब्लॉक्स JCB ने काढून रस्ता सपाट केला

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!