पाचोरा | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने पाचोरा शहरात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात देखील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी होत्या. ताईंच्या हस्ते माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मीनाताई ठाकरे आदींच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून नारीशक्तीचा गौरव केला. त्या म्हणाल्या की, आज महिला या सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्या अतिशय आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. राजकीय क्षेत्राचा विचार केला असता ५० टक्के मतदार असणार्या महिला या अतिशय जागरूकपणे आपला अधिकार बजावत असून आगामी काळात याचे दृश्य परिणाम दिसून येतील असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी सौ. तिलोत्तमा मौर्य, सौ. जयश्री येवले, सौ. अनिता पाटील, सौ. कुंदन पांड्या, सौ. मंदाकिनी पारोचे, सौ. लता पाटील तसेच अंगणवाडी सेविका लताबाई पाटील, नलिनी चौधरी,नूतन कासार, सुनिता पाटील, वैशाली चौधरी, सुरेखा मोरे, दुर्गा चौधरी, सुरेखा माळी, पुष्पा सोनार, आणि महिला पोलीस भगिनी उपस्थित होत्या.
