Home » राजकीय » डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांनी बांधले शिव बंधन; ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर !

डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांनी बांधले शिव बंधन; ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर !

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगली लोकसभा मतदार संघातील युवा, तड़फदार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मातोश्रीवरील पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे ५०० गाड्यांचा मोठा ताफा आणि असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी मातोश्रीवर जमली. याप्रसंगी चंद्रहार पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अबकी बार चंद्रहार, अशा घोषणांनी मातोश्री दणाणुन गेले. चंद्रहार ५ लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, अशी घोषणाबाजीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

उद्धव ठाकरेंनी दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत – यावेळी बोलतांना उद्धव ठाकरेंनी चंद्रहार यांसह मातोश्रीवर सर्वांचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले की, आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. चंद्रहार सारखा पैलवान असला तर सांगलीसह महाराष्ट्रात आपल्या विरूद्ध कोणी लढण्याची हिंमत करणार नाही. नामर्द पळून जात आहेत तर मर्द शिवसेनेत येत आहेत, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा निर्णय घेणारा मी कोण? आता सांगलीच्या जनतेनेच ठरवले असेल तर मी अडवणारा कोण?, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे चंद्रहार पाटील यांच्या सांगलीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. गदा आणि मशाल घेवून एक मर्द आम्ही दिल्लीला पाठविणार आहोत, असे सांगत त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. याचवेळी सांगली शिवसेना ठाकरे गटाच्या संघटकपदी चंद्रहार पाटील यांची नियुक्ती केल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.

ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील यावेळी म्हणाले की, आज मला मनापासून आभार मानायचे आहेत की, एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले. तुम्ही मला सांगली लोकसभेच्या दृष्टीने जो मान दिला, त्यासाठी मी आभारी आहे. तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करुन दाखवण्याची सवय आहे. महाराष्ट्रातील पहिला निकाल सांगलीतून असेल, एवढे वचन मी तुम्हाला देतो, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले.

चंद्रहार यांनी गेल्या वर्षीच २०२४ लोकसभा लढवायचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने चंद्रहार यांनी विविध पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. खासकरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. मात्र लोकसभा सांगली मतदारसंघातून तिकीटाची हमी मिळाल्याशिवाय पक्ष प्रवेश करायचा नाही, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर भेट देऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. शेवटी शनिवारी खासदार राऊत यांच्यासोबत पुण्यात चर्चा झाल्यावर चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्याशी चर्चा करुन त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश निश्चित केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!