Home » जळगाव » राष्ट्रीय योग परिषदेत ‘डिजिटल युगामध्ये सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व’ या विषयावर चर्चासत्र

राष्ट्रीय योग परिषदेत ‘डिजिटल युगामध्ये सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व’ या विषयावर चर्चासत्र

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित एम.जे. कॉलेजच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीच्या वतीने “डिजिटल युगात सर्वांगीण स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व” या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्याशाखीय परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अरुण खोडस्कर अमरावती, प्राचार्य डॉ.निलेश वाघ नाशिक, केसीई सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, मानव्यविद्या शाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे आणि सोहम योग विभागाचे संचालक डॉ.देवानंद सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

महर्षी पतंजली आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलनाने या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. स्वरदा संगित विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि महाराष्ट्र गीत गायन केले. उद्घाटनीय सत्रामध्ये योगाचार्य डॉ.देवानंद सोनार लिखित ‘हठप्रदीपिका योगांग परिचय – प्रचलित विधींसह’ या पुस्तकाचे विमोचन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी याप्रसंगी या पुस्तकाबद्दलची आपली भूमिका उपस्थिततांसमोर व्यक्त केली.

डिजिटल युगामध्ये आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, लक्षणे आणि त्यावरील प्रभावी योगिक उपचार पद्धती याविषयीचे विचार मंथन उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले. अतिथी प्रा.डॉ.अरुण खोडस्कर (महासचिव, बृहन्महाराष्ट्र योग परिषद, अमरावती) यांनी योगाच्या बदलत्या स्वरूपावर आपले विचार मांडले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ.अखिलेश शर्मा यांनी तर प्रास्ताविक आणि आभार डॉ.देवानंद सोनार यांनी व्यक्त केले.

उद्घाटन सत्रानंतर नंतर प्राचार्य डॉ.निलेश वाघ यांनी विषयाला अनुसरून आपले मनोगत व्यक्त केले. त्यात डिजिटल माध्यम आणि त्याच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, त्याची लक्षणे आणि त्यावरील योगिक उपाय सांगितले. योग क्षेत्रातील नवीन संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग यावर त्यांनी प्रकाश टाकला.

दुपारच्या सत्रामध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपल्या शोधनिबंधांचे सादरीकरण केले. संशोधन पेपर परीक्षक म्हणून डॉ.भाग्यश्री भलवतकर आणि डॉ.रजनी सिन्हा यांनी परीक्षण केले. शोधनिबंध सादरीकरणानंतर उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संस्थापक योग विभाग अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण जोशी यांनी आपल्या व्याख्यानातून योगासनांचा उपयोग नाडी विज्ञान आणि आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने केला जाऊ शकतो आणि सर्वांगीण स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्रगत योगाभ्यास यावर कसा प्रभावशाली ठरतो, योगासने नाडिवर कसा प्रभाव पाडतात, योगसाधनेच्या माध्यमातून शरीर आणि मन कसे सुदृढ आणि स्वस्थ ठेवता येतील. याबद्दलच्या उपाययोजनांचे सविस्तर विवेचन आपल्या मार्गदर्शनातून केले.

समारोपीय सत्रामध्ये मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ.बी.एन. केसुर अधिष्ठाता मानव्यविद्या शाखा, प्रमुख अतिथी डॉ.लक्ष्मीनारायण जोशी केसीई सोसायटी व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे, सोहम योगचे संचालक डॉ.देवानंद सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. देवानंद सोनार यांनी योग परिषद अहवालाचे वाचन केले. त्यानंतर डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी योग साधना सर्वांसाठी स्वास्थ हेतूने आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले. अध्यक्षीय मनोगतातून डॉ.केसुर यांनी आधुनिक युगामध्ये स्वास्थ्यासाठी अशा प्रकारची परिषद आयोजित केल्याबद्दल कौतुक केले आणि भविष्यात व्यापक प्रमाणात अशी कॉन्फरन्स आयोजित करण्यासंदर्भात सूचित केले.

यावेळी शोधनिबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट फेडरेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या डॉ.शरयू विसपुते यांचा याप्रसंगी अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भुसावळ, जळगाव आणि इतर ठिकाणांवरून योग परिषदेत सहभागी झालेल्या विविध संघटनांचे आणि योग केंद्र संचालकांचे सुद्धा सत्कार करण्यात आले. आभार प्रदर्शन आणि शांतीपाठाने परिषदेचा समारोप करण्यात आला. परिषदेत विविध ठिकाणांहून १२० लोकांनी सहभाग नोंदविला आणि २५ संशोधकांनी शोधनिबंध सादरीकरण केले.

या एक दिवसीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य सं.ना. भारंबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर स्वरदा संगीत विभाग, ओजस्विनी फाईन आर्ट्स, संस्कृत आणि तत्त्वज्ञान विभाग यांच्यासह सोहम विभागातील प्रा. पंकज खाजबागे, प्रा.ज्योती वाघ, प्रा.अनंत महाजन, प्रा.सोनल महाजन, प्रा.श्रद्धा व्यास, शुभम पाटील, राहुल खरात, कमलाकर पाटील यांच्यासह सोहम विभागातील योगशिक्षक पदविका, बी.ए. योगशास्त्र, एम.ए. योगिक सायन्स अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, योगासन खेळाडू, जळगाव मधील विविध योग केंद्रांचे संचालक, विविध समित्यांचे पदाधिकारी यांचे परिषदेच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.

सर्वांगीण स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा महत्त्वपूर्ण उपाय असून त्याशिवाय स्वास्थ्यपूर्ण जीवन जगणे अशक्य आहे. म्हणून प्रत्येकाने या डिजिटल युगात योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग मानून नियमित योग साधना करावी. अशाप्रकारचा आशय या परिषदेतून व्यक्त झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!