Headlines
Home » जळगाव » दोन दिवसात महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा महामार्ग उखडून वाहतूक बंद करू : माजी उपमहापौर कुलभूषण पाटील

दोन दिवसात महामार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा महामार्ग उखडून वाहतूक बंद करू : माजी उपमहापौर कुलभूषण पाटील

HIT AND RUN : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा निषेध तसेच राज्य सरकार व जळगाव जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनते विरुद्ध शहरात रोज होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी खोटे नगर स्टॉप ते आकाशवाणी चौक मार्गावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी जळगावकर या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे हे अपघातांना कारणीभूत ठरत असुन दिवसेंदिवस त्यात निष्पाप लोकांचा नाहक बळी जात आहे. मात्र येथील ढिम्म प्रशासन आपल्या कामाप्रती उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सगळ्या भोंगळ कारभारा विरोधात आणि बुधवार दि.२८ रोजी झालेल्या अपघातात गेलेल्या दोन निष्पाप बळी तसेच राज्य सरकार व जळगाव जिल्ह्यातील मंत्री आणि येथील लोकप्रतिनिधी यांचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान मोर्चा वेळी महाविकास आघाडीकडून ‘शिवसेना’ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तथा जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधुन काही मागण्या राज्य सरकारकडे केल्या. यावेळी कुलभूषण पाटील यांनी दि.२८ रोजी महामार्गावरील एका खड्डयामुळे निष्पाप विवाहिता व एक तरुणी यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

म्हणून या झोपलेल्या सरकारला व प्रशासनाला जागे करण्यासाठी आजचा जनआक्रोश मोर्चा असल्याचे सांगत लवकरात लवकर महामार्ग खड्डे मुक्त करावा आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री खरोखर जर संवेदनशील असतील तर जळगाव येथील खराब महामार्गाच्या कामास जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर देखील रायगड जिल्ह्यात दिले तसे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

◆ अन्यथा महामार्ग रहदारीस पुर्णपणे बंद करू

कुलभूषण पाटील पुढे म्हणाले की अशा खराब मार्गावर वाहतुकीमुळे जर निष्पाप जीव जात असतील तर अशा रस्त्यावरील रहदारी बंद केलेलीच बरी. म्हणून या जिल्ह्याचे मंत्री, अधिकारी तसेच प्रशासन यांना विनंती आहे की, सदर मागण्या या दोन दिवसात पूर्ण न केल्यास महामार्ग जेसीबी च्या सहाय्याने उखडून टाकून वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येईल असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.

◆ महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार !

या महामार्गावरुन मंत्री, खासदार, आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री दररोज ये जा

करतात त्यांना हा खराब झालेला रस्ता दिसत नाही का ? या सर्वांनी याकडे लक्ष देऊन त्वरीत रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा या खासदार, पालकमंत्री आणि आमदारांचे त्यांच्या सरकार मध्ये काहीच वजन नसून ते सर्व निष्क्रीय आहेत असे आम्ही समजू सांगत सगळ्यांचा समाचार घेतला. तसेच बायपासच्या नावाने वेळकाढू यांचे धोरण असुन शहरातून गेलेल्या या महामार्गाची एका वर्षात झालेली ही अवस्था आणि निष्कृष्ट काम बघता मोठ्या प्रमाणात टक्केवारी वाटप होऊन भ्रष्टाचार झाला असल्याची शंकाही कुलभूषण पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

सदर मोर्चाची सांगता शेवटी आकाशवाणी चौक येथे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख प्रमोद बापू पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

आजच्या या जनआक्रोश मोर्च्यात लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष तुषार सावंत, संदीप पाटील, माजी नगरसेवक सचिन पाटील, अमर जैन, माजी नगरसेविका पर्वता भिल्ल, शिवसेना महिला आघाडीच्या मनीषा पाटील, निलू इंगळे, विमल वाणी, जया तिवारी, युवासेना जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, अमित जगताप, हर्षल मुंडे, बांधकाम व्यावसायिक नरेंद्र पाटील, सतीश मोरे, योगीराज पाटील, दीपक पवार, शुभम सोनवणे तसेच जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!