वांद्रे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईमध्ये बॉलीवुड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्राइव्हरने तीन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाण केल्याचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडन ने वृद्ध महिलेवर हात उचलल्याचा आरोप या व्हिडीओत करण्यात आला आहे.
दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवीनाच्या ड्राइव्हरवर रॅश ड्राइव्हिंगचा आरोप करण्यात आला आहे. रवीनाच्या ड्राइव्हरने कार्टर रोडवर तीन जणांना कारने धडक दिल्याचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा स्थानिकांनी कार अडवली, त्या कारमधुन रवीना मद्यधुंद अवस्थेत बाहेर येऊन पीडितांना शिवीगाळ आणि मारहाण करू लागली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पीडित आणि स्थानिकांनी रवीनाला घेरल्याचं पहायला मिळत आहे. तसेच ते पोलिसांना बोलवताना दिसत आहेत.
नंतर या व्हिडीओत एक व्यक्ती संपूर्ण घटना सांगताना म्हणतो की, “माझी आई, बहीण आणि भाची हे रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाची गाडी आईवर धावून गेली. याविषयी जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा ड्राइव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली. नंतर रवीनासुद्धा कारमधून बाहेर आली आणि ती मद्यधुंद अवस्थेत होती. तिने सुद्धा माझ्या आईवर हात उचलला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागला आहे.” आई आणि भाचीसह खार पोलीस ठाण्यात चार तास थांबल्यानंतरही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असाही आरोप मोहम्मदने केला आहे. “त्यांनी आम्हाला पोलीस ठाण्याच्या बाहेर तोडगा काढण्यास सांगितलं. पण आम्ही तडजोड का करायची? माझ्या आईवर हल्ला झाला आहे आणि मी न्यायाची मागणी करतोय”, असं तो व्हिडीओत पुढे म्हणतो.
याप्रकरणी अद्याप रवीनाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की, रवीना टंडनचा ड्राइव्हर त्याची कार घराच्या आत पार्क करण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी ती कार रिव्हर्स घेत असताना काही लोक तिथे आले आणि त्यांनी गोंधळ घातला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही पक्षांना फिर्याद देण्यास सांगण्यात आले होते, मात्र याप्रकरणी दोघांकडून कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.
