काँग्रेस मुख्यालयात काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषद घेत राहुल गांधी म्हणाले की, आम्ही ही लढाई फक्त मोदींविरोधातच नव्हे तर संस्थांविरुद्धही लढली.
दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निकाल येण्यास सुरवात झाली असुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, आम्ही ही लढाई फक्त मोदींविरोधातच नव्हे तर संस्थांविरुद्धही लढली. जेव्हा आमची खाती गोठवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं तेव्हाच मला विश्वास वाटत होता की आता जनताच संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल.
इंडिया आघाडी ज्या जागांवर लढली तिथे आम्ही एकजुटीने लढा दिला. इंडिया आघाडीने देशासमोर एक नवं व्हिजन ठेवलं आहे. देशाच्या गरीब जनतेने संविधानाला वाचवलंय. खूप लोक गप्प होते, पण देशातील सर्वात गरीब लोक हे संविधान वाचवायला उभे राहिलेत. सहकारी, कार्यकर्ते आणि जनतेचे मी आभार मानतो, तुम्ही संविधान वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. आम्ही भारताला नवं व्हिजन दिलंय असही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
इंडिया आघाडीकडे बहुमत नाहीये, मात्र सत्ता स्थापनेसाठी हालचाली करणार का ? सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीतील सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊ. त्यावेळी याबाबत चर्चा करू. सहकाऱ्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, बैठकीत जे होईल त्यावर आम्ही निर्णय घेऊ.
