जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी न करता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पदरित्या अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय रजा घेऊन आंदोलन केले.

या आंदोलनात माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली, अधीक्षक रियाज तडवी, शापोआ पंचायत समिती जळगाव अधीक्षक अजित तडवो, शापोआ पंचायत समिती यावल अधीक्षक सचिन मगर यांनी सहभाग घेतला. या आंदोलनाला शिक्षण विस्तार अधिकारी संघटना जिल्हा जळगाव यांचा सक्रिय पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना निवेदन देताना शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे फिरोज पठाण, नरेंद्र चौधरी, एजाज शेख, प्रतिभा सानप, रागिणी चव्हाण, खलील शेख आणि विजय पवार उपस्थित होते.
सदर प्रकरणी सखोल चौकशी न करता झालेल्या अटकेचा निषेध करण्याचा आणि संबंधित अधिकाऱ्यांबद्दल न्याय मागण्यासाठी संघटना आग्रही आहे.
