जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहराच्या मध्यवर्ती भागात गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्री व्यवसायाचा पोलिसांनी पडदा फाश केला. शुक्रवारी रात्रीच्या वेळी छापा घालत स्पा सेंटर मधून चार महिलांची सुटका करण्यात आली. सेंटरचा मालक व व्यवस्थापक यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
जळगावतील नयनतारा ऑर्किड मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आड चार महिलांकडून मसाज करण्याच्या नावाने देहविक्री व्यवसाय करण्यात येत होता. त्यास त्यांचा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी राहणार चत्तरगढ जि. सिरसा हरियाणा हा प्रोत्साहन देत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरवर एक बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकाला सेंटरचा व्यवस्थापक राजू माधुजी जाट या कलोधिया तहसिल पिंपरी जि. भिलवाडा राजस्थान याने बनावट ग्राहकास स्पा मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर या सेंटर छापा टाकण्यात आला.
दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करून त्यांना आशादीप निराधार महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले. संशयित व्यवस्थापक राजू जाट याला अटक करण्यात आली. ही कारवाई एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शहर पोलीस ठाण्याचे अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, उपनिरीक्षक शरद बागल, महेश घायतड, विजयसिंह पाटील यांनी केली.
