Home » जळगाव » ५००० रूपयांची लाच घेतांना पिंप्राळा मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

५००० रूपयांची लाच घेतांना पिंप्राळा मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :
शासकीय कार्यालयात आपली कामे करुन घेण्यासाठी अनेकांना विविध अनुभव येत असतात. बऱ्याचदा आपली कागदपत्रे पूर्ण असतांना देखील ‘विशेष व्यावहारीक पूर्तता’ न केल्याने कार्यालयात विनाकारण चकरा माराव्या लागतात. असाच काही अनुभव सावखेडा येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तिस आला. सात बारा उताऱ्यावर नाव लाऊन देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यास लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कारवाईमुळे महसूल व इतर शासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे. तर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावखेडा जि. जळगांव येथील तक्रारदाराने सात बारा उताऱ्यावरुन वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करुन आईचे नाव लावण्यासाठी तलाठी कार्यालय पिंप्राळा येथे दि.१६ मे २०२४ रोजी अर्ज केला होता. त्यानंतर दि.२० मे २०२४ रोजी तक्रारदार आपल्या अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता किरण बाविस्कर या मंडळ अधिकाऱ्याने सदर कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.

दरम्यान तक्रारदाराने दि.२७ मे रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथील कार्यालयात जाऊन सदर घटनेबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार आज दि.६ जून रोजी एसीबी च्या पथकाने सापळा रचुन तक्रारदाराकडून लाच घेतांना मंडळ अधिकारी किरण बाविस्कर यास तलाठी कार्यालय पिंप्राळा येथे ५००० रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. त्याचेवर रामानंदनगर पोलीस स्टेशन जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सदर कारवाई ही सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने तसेच कारवाई मदत पथकातील पो.नि. एन.एन. जाधव, पी.एस.आय. सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपो हेकॉ शैला धनगर, पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!