जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनी गजबजलेल्या परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खचलेल्या महमार्गाविषयी काल ‘वास्तव पोस्ट‘ ने स्पॉटवर जाऊन पाहणी केली होती. केलेल्या पहाणीत महामार्गाचे विदारक वास्तव बातमीच्या स्वरुपात ‘वास्तव पोस्ट‘च्या माध्यमातून मांडले होते.
त्यानुसार संबंधित विभागाकडून दखल घेऊन काही तासातच त्या ठिकाणावर उंचवटे तयार झालेला भाग खरडून काढण्यात आला, आणि ते वेस्टेज मटेरियल म्हणजेच कोरडे डांबर, खरडल्याने निघालेली खडी आणि त्यातली माती व बारीक कच हा त्याच ठिकाणी खचलेल्या भागात भर म्हणून नुसताच लोटण्यात आला आहे.
या लोटलेल्या भर मुळे महामार्गावर धुळीचे प्रचंड लोट दिसून येत आहेत. याचा त्रास चालकांना व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सोसावा लागत आहे.
दरम्यान आज या ठिकाणी ‘वास्तव पोस्ट‘ कडून पुन्हा पहाणी करण्यात आली असता सदर वरवर केलेल्या खरडपट्टीचा प्रकार दिसून आला.

महामार्गावरील वाहतुकीमुळे येथील तो भर सर्वत्र पसरला गेला आहे. खडी व दगड विखुरले गेल्याने दुचाकी वाहन घसरून दुचाकीस्वारांवर मात्र मलमपट्टी करण्याची वेळ येऊ शकते इतकी भयंकर अवस्था आज केलेल्या पाहणीतुन दिसून आली.

‘वास्तव पोस्ट‘ कडून पाहणी करीत असतांना महामार्गालगत असलेले छोटे टपरीधारक, एक शहरवासी आणि काही महाविद्यालयीन तरुण यांनी शासन, प्रशासन, ठेकेदार यांचा या दर्जाहीन कामाचा आपल्या खान्देशी शैलीत यथेच्छ खरपुस समाचार घेतला. टपरीधारक उडणाऱ्या धूळीने वैतागलेले दिसून आले. तर महाविद्यालयीन तरुण दुचाकी चालवतांना मोठी कसरत करावी लागते म्हणून वैतागलेले होते, आणि लॉकडाउन काळात काय मंजूर केले आणि काय करून ठेवले असे सांगत झालेल्या कामाबद्दल शहरवासीने नको त्या शब्दात आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
असो, राजकीय दौऱ्यांवेळी रातोरात तयार करून चकचकित होणारे रस्ते बघता…, केले तर सगळं शक्य आहे. मात्र प्रश्न कोण्या राजकीय व्यक्तीच्या दौऱ्याचा नसून जळगावकरांचा असल्याने रातोरात तरी कामं होणे अपेक्षित नाही. मात्र पुढील दोन चार दिवसांत या खरडपट्टीवर डांबररूपी मलमपट्टी केलेली दिसून येईल एवढीच अपेक्षा.
भाग:२
