Home » जळगाव » मू.जे. महाविद्यालयामध्ये ‘कवी कालिदास’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

मू.जे. महाविद्यालयामध्ये ‘कवी कालिदास’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “अपूर्व ज्ञान कौशल्य आणि प्रतिभेच्या बळावर महान कवी कालिदास यांनी कालातीत साहित्य निर्मिती केली. त्यांनी रचलेल्या साहित्य कृतींमुळे  निसर्ग, मानव आणि साहित्य सौंदर्याचा विस्तार लक्षात आला. कल्पनेची उंची, शब्दांचा योग्य जागी वापर आणि लालित्याचा समावेश  हा कालिदासाच्या साहित्याचा गाभा राहिला आहे. त्यांनी आपल्या पूर्व परंपरांचा, पूर्व साहित्याचा गाढा अभ्यास केला होता, आणि सोबतच आपल्यामधील प्रतिभेचा पूर्ण वापर करून जगाला एका पेक्षा एक असे साहित्य रत्न दिलेत.  त्यांच्यामुळे न केवळ संस्कृत साहित्य अजरामर झाले असे नाही तर त्यांच्या साहित्यामुळे  विश्व साहित्याला प्रेरणा आणि दिशा प्राप्त झाली.” असे विचार वैश्विक संस्कृत मंचाचे महासचिव डॉ.राजेश कुमार मिश्र यांनी प्रकट केले.

मूळजी जेठा महाविद्यालयातील संस्कृत विभाग, वैश्विक संस्कृत मंच आणि साहित्य भारती, जळगाव यांच्या वतीने कालिदास जयंती निमित्त एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मू.जे. महाविद्यालयात करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राजेश कुमार मिश्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भूषण कवीमंडन यांनी संस्कृत भाषा आणि साहित्यामधील ज्ञानाचा भारतीय ज्ञान परंपरेमध्ये कसा उपयोग होत आलेला आहे, यावर भाष्य केले.

विचार मंथन सत्रामध्ये संस्कृत  विभागाचे डॉ.अखिलेश शर्मा यांनी कालिदास साहित्यामधील सौंदर्य स्थळे यावर मार्गदर्शन केले. यांनतर डॉ. महेश जोशी, डॉ. स्वप्नील सहस्रबुद्धे, वृषाली जोशी, प्रीती शुक्ल, पल्लवी जोशी, प्रशांत जानी आणि द्वारिकाधीश जोशी यांनी आपापले संशोधन निबंध सादर केलेत.या सत्रामध्ये साहित्य भारती, जळगावचे अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यकार डॉ सुभाष महाले सत्राध्यक्ष महणून उपस्थित होते. त्यांनी संशोधक विद्यार्थ्याच्या सादरीकरणावर आपले मत प्रकट केले.

संस्कृत विभाग प्रमुख डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी या चर्चासत्राचे प्रास्ताविक केले, सोबतच कालिदास यांच्या काव्यामधील फुलांचे वर्णन या विषयावर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धी उपासनी हीने केले, तर आभार डॉ.अखिलेश शर्मा यांनी मानलेत. या चर्चासत्रामध्ये डॉ. विजय लोहार, डॉ.उषा शर्मा, डॉ.उज्वला नेहते, डॉ.राम बुधवंत, राखी देशपांडे, विशाखा देशमुख, रश्मी पुणतांबेकर, सुजाता देशपांडे, श्यामकांत बाविस्कर, सुधीर ओखदे आणि संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!