Headlines
Home » जळगाव » राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ?

राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बच्चे कंपनी मात्र मनसोक्त आनंद लुटतांना दिसून आली. बऱ्याच कॉलनीनींमध्ये पाणी साचुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जेथे रस्तेच नाहीत अशा कॉलनीत तर पायी चालणे देखील कठीण झाले आहे.

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून त्याची चाळणी झाली आहे. अशातच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील राष्ट्रीय महामार्गावर बुधवार दि.२१ रोजी संध्याकाळी पेव्हर ब्लॉक्स बसवून दुरुस्ती कामास सुरवात करण्यात आली होती. बुधवार रात्र आणि गुरुवार पूर्ण दिवस तेवढा भाग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. आणि शुक्रवार दि.२३ रोजी त्यावर वाहतूक सुरु होऊन २४ तासाच्या आतच त्या कामाचे तीन तेरा वाजले होते.

पेव्हर ब्लॉकच्या कामाची पद्धत आणि खचणाऱ्या महामार्गाचा आता पर्यंतचा इतिहास, तसेच त्यात एक भर म्हणजे पाऊस बघता पुढील काही तासात हा स्पॉट अजुन काहीतरी वेगळे रूप दाखवू शकतो, असा अंदाज आम्ही बांधलाच होता.

दरम्यान काल दुपारी ३:१० वाजता या स्पॉटवर फेरफटका मारला असता महामार्गाचे भयंकर दृश्य बघावयास मिळाले. वास्तव पोस्ट आल्याचे दिसताच सबंधित कर्मचाऱ्यांनी पुढील काही वेळातच महामार्गाचे ते रूप वरवर बदलवले खरे, मात्र त्या आधीच सदर स्पॉट च्या वास्तवतेचे व्हिडिओ चित्रीकरण करून आम्ही तेथून निघुन गेलो होतो.

सदर चित्रिकरणात संबंधित विभागाच्या भोंगळ कामाची प्रचिती येते. याठिकाणी काल दुपारनंतर उखडलेले सर्वच पेव्हर ब्लॉक्स संध्याकाळी उचलून महामार्गाच्या मध्यभागी रचून ठेवण्यात आले आहे. आकाशावाणी चौकामध्येही निघालेले पेव्हर ब्लॉक्स सर्कलवर ठेवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या वर्षापासून या स्पॉटवर अंदाजे करोड रूपयांच्या जवळपास खर्च होऊन देखील परिस्थिती ही पूर्वी होती तशीच आहे. यामुळेच केल्या जाणाऱ्या कामावर तसेच गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे सहाजिकच आहे. पेव्हर ब्लॉक्स बसविण्याआधी महामार्गाच्या खचलेल्या भागाचा पाया किंवा पृष्ठभागास रोलिंग करण्यासाठी रोड रोलर आवश्यक असल्याने दि.२१ रोजी काम सुरु होण्याआधी दुपारी तेथे रोलर होते. संध्याकाळी जेव्हा प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली तेव्हा मात्र रोलर तेथे नव्हते.

दरम्यान रोलर नसतांना एका जुगाड (?) पद्धतीने पाया किंवा पृष्ठभागास रोलिंग केले जात होते. नेमके त्याचवेळेस संध्याकाळी ६:५५ मिनिटांनी वास्तव पोस्ट तेथे धडकले, तेव्हा सुरु असलेला ‘तो’ जुगाड दिसून आला. संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यास रोलर बाबत विचारणा केली असता त्याने कॉल केल्यावर पुढच्या २० ते २५ मिनिटांनी साधारणतः ७:२५ वाजता रोलर स्पॉटवर पोहचले व त्यानंतर रात्रभरात पेव्हर ब्लॉक्स च्या पूर्ण केलेल्या कामाची गुणवत्ता(?) दि.२३ रोजी दिसायला सुरवात झाली. आणि दि.२४ रोजी पेव्हर ब्लॉक्स बसविलेल्या कामाचा अक्षरशः निकाल लागला. यांच्या या अशा कामाच्या पद्धतीमुळे कामाची गुणवत्ता राहणार की ढासाळणार हे आता वेगळं काही सांगायला नको.

शेवटी शासन, प्रशासन तथा संबंधित विभागांस एकच सांगावेसे वाटते, की जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या या स्पॉटवर ‘जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ आतातरी कायमस्वरूपी थांबवावा’.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!