कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापुरच्या कळंबा कारागृहातून एक धक्कादायक घटना आली आहे. कळंबा जेल हे वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहीले आहे. कधी या जेलमध्ये गांजा सापडतो, तर कधी पोलिसच कैद्यांना गांजा पुरवता, तुरुंगात मोबाईल फोन सापडल्याच्या घटना देखील येथे घडल्या आहेत. आता या जेलमध्ये चक्क कैद्यामध्ये भांडण होवून त्यात एका कैद्याचा खुन झाला आहे. खुन झालेला आरोपी हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.
याबाबत अधिक माहीती अशी की, कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दोन गटामध्ये आज सकाळी वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत ७० वर्षीय आरोपीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. ठार झालेला आरोपी हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.
याबाबतच्या मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी सध्या कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी येथील न्यायालयीन कोठडीतले आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच आरोपींनी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याला जबर मारहाण केली. यावेळी यातील एका आरोपीने ड्रेनेजवरील लोखंडी झाकण डोक्यात घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर कळंबा कारागृहात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कळंबा कारागृहात दाखल झाले.
दरम्यान कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल तसेच अंमली पदार्थ सापडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होतं असल्याने या कारागृहातील भोंगळ कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यात आज घडलेल्या घटनेची भर पडली आहे.
