मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकुन इतिहास घडवला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विदर्भानेही जोरदार खेळ करत चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही जोरदार खेळ सुरु केला. जिंकण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडकर उपहारानंतर शतक ठोकून बाद झाला. मुंबईने उपहारानंतर विदर्भाला कोंडित पकडले, व गडी बाद होतं गेले. आपला अखेरच्या सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णी याने शेवटची विकेट घेत विदर्भाचा डाव संपुष्टात आणला. विदर्भाचा दुसरा डाव १३४.३ ओव्हरमध्ये ३६८ धावांवर आटोपला. मुंबईची ही रणजी ट्रॉफी जिंकण्याची ४२ वी वेळ ठरली.
विदर्भाकडून कॅप्टन अक्षय वाडकर याने सर्वाधिक १०२ धावांची शतकी खेळी केली. मात्र त्याचं शतक व्यर्थ ठरलं. करुण नायर याने ७४ धावांची खेळी केली. हर्ष दुबे याने ६५ धावा केल्या. सलामीवीर अथर्व तायडे आणि ध्रुव शौरी या दोघांनी प्रत्येकी ३२ आणि २८ धावा तर अमन मोखाडे याने ३२ धावा केल्या. आदित्य ठाकरे नाबाद आऊट राहिला.
मुंबईकडून तनुष कोटीयन याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मुशीर खान आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स गेल्या. तर शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. सामनावीर मुशीर खान तर मालिकावीर पुरस्काराने तनुष कोटियनला गौरविण्यात आले
