जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये दि.१७ आणि १८ जानेवारीला चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात दोन दिवस विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार पहावयास मिळाला. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी जळगावच्या उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे आणि जळगावचे अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते उपस्थित होते. समारोपावेळी अर्चना मोरे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटल्या की,

विधायक युवा शक्तीच्या बळावर कुठलाही देश आपला उत्कर्ष साधत असतो. ही प्रचंड ताकत अनेक परिवर्तन करू शकते. त्यासाठी तरुणांनी योग्य अशी स्वप्न पाहावीत आणि त्याच्या पूर्ती साठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी आपली विधायक उर्जा चांगल्या कामांमध्ये आणि आपले उज्वल भविष्य बनविण्यासाठी वापरावी. अभ्यासाचं एकसुरीपण थोड दूर सारून आनंदाचे क्षण अनुभव करण्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात. शाळा-महाविद्यालयातील स्नेहसंमेलने ही तरुणाईच्या सृजन क्षमतेच्या आविष्काराला संधी देणारी उत्तम अशी व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांनी या व्यवस्थेचा अधिकाधिक उपयोग घेतला पाहिजे. यातून आपल्या करियरला दिशा देता येते.

स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण सोहळयाचे दुसरे प्रमुख पाहुणे असलेले जळगावचे अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की सोशल मीडिया आणि जीवघेण्या स्पर्धेच्या काळात आपल्यात जर अंगभूत कौशल्ये असली तरच पाहिलेली स्वप्न पूर्ण करता येतात. विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य ध्येय ठरवावे. त्याच्या पूर्तीसाठी प्रचंड परिश्रम घ्यावे. विद्यार्थी दशेत अभ्यासाबरोबरच आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभाग घ्यावा, कारण यातून आपल्या व्यक्तिमत्वाला नवीन कांगोरे लाभत असतात. जीवन किंवा भविष्याविषयी गंभीर असावे लागते. म्हणून यशासाठी प्रामाणिक परिश्रम आणि योग्य नियोजन करावे.
यावेळी अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांनी सुद्धा युवकांच्या भविष्यासाठी कलाविष्कार आणि सृजनक्षमता किती आवश्यक असते, यावर आपले अनमोल विचार प्रकट केलेत. स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.भूपेंद्र केसूर यांनी स्नेहसंमेलनातील कार्यक्रमांचा आणि वर्षभर महाविद्यालयाच्या कार्य-कर्तुत्वाचा अहवाल सर्वांसमोर मांडला. यावेळी व्यासपीठावर विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.के.जी. खडके, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या प्रा.सुरेखा पालवे, महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ.जगदीप बोरसे, सोबतच, डॉ.केतन नारखेडे, डॉ.भूषण कविमंडन, डॉ.देवांनंद सोनार, डॉ. अब्दुल कादिर आरसीवाला, डॉ.लीना ढाके उपस्थित होते.

दि.१८ जानेवारी रोजी सकाळी घेण्यात आलेल्या मूल्जियंस गायक स्पर्धेमध्ये मुक्ता चौधरी हिला प्रथम क्रमांक, भाग्यश्री काळे हिला द्वितीय क्रमांक आणि समर्थ वैशाली शिरसाळे यास तृतीय क्रमांक मिळाला. त्यांनतर विविध मनोरंजन या कार्यक्रमात एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये गीत-गायन, बासरी वादन, तबला वादन, स्टँडअप कॉमेडी इत्यादी कला प्रकार सादर करण्यात आले, या समितीचे प्रमुख डॉ.मनोज चोपडा हे होते.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील बेस्ट स्टूडंट ‘प्रथमेश महेश खेवलकर’ हा ठरला. आणि प्राचार्य घोषित विद्याशाखानिहाय प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर्स म्हणून कला विद्या शाखेतून रसिका मुकुंद ढेपे, विज्ञान शाखेतून प्रियंका चंद्रकांत बारी आणि वाणिज्य शाखेतून नयना नरेंद्र वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यासोबतच एकलव्य क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच दिल्ली एथिक कर्तव्य पथावर आरडीसी शिबिरात समाविष्ट असलेला एनसीसी युनिटचा छात्र सैनिक गुणवंत खाडे, पुणे येथे झालेल्या परेड मध्ये सहभागी असलेली सिनियर अंडर ऑफिसर साक्षी सिंग दिल्ली येथे पार पडलेल्या जी.व्ही.मावळणकर शिबिरात सहभाग घेतलेली मोहिनी सपकाळे, दिल्ली येथील थळ सेना शिबिरात सहभाग घेतलेली छात्र सैनिक अमृता तळेले आणि प्रवीण राठोड या सर्व छात्र सैनिकांचा विवेश सत्कार करण्यात आला.
सोबतच हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध दात्यांनी दिलेल्या एकूण ६५ प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा प्रदान करण्यात आली. विविध सदर समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.योगेश महाले यांनी केले. या स्नेह संमेलनामध्ये कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एकूण २४ समित्या गठीत करण्यात आल्या होत्या.
